लॉक डाऊन संपला, पण व्हायरस नाही, पंतप्रधानांनी दिला देशवासियांना सावधगिरीचा इशारा

October 20,2020

नवी दिल्ली :२०ऑक्टोबर - विसरू नका, लॉकडाऊन संपला असला तरी व्हायरस गेलेला नाही, आज तुम्हा सर्वांच्या सहकार्यामुळे देश सांभाळलेल्या अवस्थेत आहे त्याला बिघडू देऊ नका सणासुदीच्या या दिवसांमध्ये बाजारातसुद्धा अनेक दिवसांनी उत्साह दिसत आहे. पण थोडीशीही बेजबाबदारी आणि दुर्लक्ष आपल्याला धोक्यात टाकू शकते हे लक्षात घ्या अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  देशवासीयांना इशारा दिलेला आहे. 

आज संध्याकाळी ६ वाजता मोदींनी राष्ट्राला उद्देशून भाषण केले. आपल्या १५ मिनिटांच्या भाषणात मोदींनी देशातील परिस्थितीचा आढावा घेतला. जगातील प्रगत राष्ट्रांच्या तुलनेत आपल्या देशात संसर्गाचे प्रमाण आणि  मृत्यूदर कमी आहे, बरे  होण्याचं प्रमाण जास्त आहे हे सांगतांना मोदींनी आकडेवारीच जाहीर केली. दर दहा लाख लोकसंख्येमागे आपल्या देशात साडेपाच हजार लोकांना कोरोना वायरसची लागण झाली आहे. हे प्रमाण इतर देशांमध्ये २५ हजाराच्या घरात आहे.  भारतात दहा लाखामागे मृत्युदर ८३ इतका आहे. इतर देशांमध्ये हा ६००च्या घरात गेला आहे. याकडे लक्ष वेधत  ही वेळ सावध राहायची आहे, असे पंतप्रधानांनी सांगितले. 

जोपर्यंत या विषाणूवर लस येत नाही, तोवर आपला लढा बंद करून चालणार नाही, अनेक देश लशीसाठी प्रयत्न करत आहेत. आपल्या देशातले वैज्ञानिकही जीवाची बाजी लावून युद्ध पातळीवर संशोधन करत आहेत. कोरोना वर लस  जेव्हा येईल, तेव्हा ती लवकरात लवकर प्रत्येत भारतीयापर्यंत कशी पोहोचेल यासाठीसुद्धा सरकार प्रयत्न करत आहे, असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले. भारतात संशोधक या लसीसाठी प्रयत्न करून मानवतेची खऱ्या अर्थाने सेवा करीत आहेत. असे ते म्हणाले. 

यावेळी मोदींनी डॉक्टर्स, परिचारिका, पोलीस या सर्वांच्याच कामाचा कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. येणारा काळ सणासुदीचा असला तरी आवश्यक ती काळजी घ्यावीच लागेल, असे त्यांनी स्पष्ट केले. 

मी तुम्ही आणि तुमचा परिवार सुरक्षित बघू इच्छितो त्यासाठी तुम्ही सहकार्य करा ही माझी हात जोडून विनंती असल्याचे मोदी म्हणाले.  सणासुदीचं उत्साहाचं वातावरण कायम ठेवा, पण निष्काळजीपणा नको, थोडासाही निष्काळजीपणा धोक्याकडे वाटचाल करणारा असेल असे त्यांनी ठणकावले.

'व्हायरस वाढू नये यासाठी खबरदारी घ्यावी लागेल. बेफिकीर होण्याची ही वेळ नाही. कोरोना गेला असं समूज नका. कोरोनाचा धोका अजूनही कायम आहे. काही देशांमध्ये कोरोनाची प्रकरणं कमी झालेली दिसली आणि नंतर पुन्हा वाढली, अशी उदाहरणं आहेत. त्यामुळे ही वेळ निष्काळजीपणाची नाही. बेजबादार लोक स्वतःबरोबर कुटुंबालाही धोक्यात टाकतात', असं मोदी म्हणाले. त्यामुळे दो गज  की दूरी, मास्क आणि सतत साबणाने हात धुणे बंद करू नका. यापासूनच कोरोना व्हायरस  ला दूर ठेवता येईल, अशी आठवण पंतप्रधानांनी करून दिली.

आपल्या भाषणात पंतप्रधानांनी माध्यमे आणि समाजमाध्यमे यांनाही सहकार्याचे आवाहन केले. तुम्ही नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करावी यासाठी सहकार्य करा, तुम्ही केलेले प्रत्येक जनजागरण ही खऱ्या अर्थाने देशसेवा ठरेल असे सांगून मोदींनी देशातील नागरिकांना नवरात्र, दसरा, ईद, दिवाळी आणि छटपूजा या सर्वच सणांसाठी शुभेच्छा दिल्या.