नागपूर जिल्ह्यात महाविकास आघाडीचे वर्चस्व, भाजपला धक्का

January 18,2021

नागपूर : १८ जानेवारी - विधानपरिषदेच्या निवडणुकीत विदर्भात भाजपला धक्का बसल्यानंतर आता ग्रामपंचायत निवडणुकीतही महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवले आहे. पूर्व विदर्भातील भंडारा गोंदिया जिल्ह्यात भाजपने आम्हीच नंबर १ असा दावा केला आहे. नागपूर जिल्ह्यात राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, राज्याचे क्रीडामंत्री सुनील केदार यांनी आपल्या मतदारसंघात घवघवीत यश मिळवून भाजपला धोबीपछाड दिली आहे. १२९ ग्रामपंचायत निकालांपैकी काँग्रेस ८३, राष्ट्रवादी १४, शिवसेना -५, भाजप -२५ अपक्ष २ जागेवर विजयी झाले आहेत. 

नागपूर जिल्ह्यातील रामटेक, कामठी, सावनेर, हिंगणा, उमरेड व काटोल या सहाही विधानसभा मतदार संघातील ग्रामपंचायतीमध्ये महाविकास आघाडीने  भरीव यश मिळवत भाजपला मागे टाकले आहे. रामटेक - काँग्रेस १७, शिवसेना -३ , उमरेड : काँग्रेस  २९, राष्ट्रवादी काँग्रेस १, शिवसेना -१, भाजप -९ अपक्ष -१ , सावनेर : १७ काँग्रेस या निवडणुकीत सुनील केदार यांनी एकतर्फी बाजी मारत भाजपला धोबीपछाड दिली आहे. कामठी : काँग्रेस ८, भाजप १०, अपक्ष १ हिंगणा : काँग्रेस ७, राष्ट्रवादी काँग्रेस २, भाजप ३ , काटोल : काँग्रेस ५, राष्ट्रवादी काँग्रेस ११, १ शिवसेना, भाजप ३ या मतदार संघात अनिल देशमुख यांच्या गटाने वर्चस्व मिळवले आहे. 

ग्रामपंचायत निवडणुकीत काँग्रेसला ८३, राष्ट्रवादी १४, शिवसेना ५ , भाजप २५ तर २ जागा अपक्षांनी जिंकल्या आहेत. माजी मंत्री राजेंद्र मुळक यांच्या नेतृत्वाखाली, पालकमंत्री नितीन राऊत, पशुसंवर्धनमंत्री सुनील केदार तर राष्ट्रवादी काँग्रेस राज्याचे गृहमंत्री  अनिल देशमुख तर शिवसेनेचे खासदार कृपाल तुमाने आमदार आशिष देशमुख, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजू हरणे , संदीप इटकेलवार यांनी एकत्र येऊन यश मिळवले. तर भाजपतर्फे ग्रामीणचे अध्यक्ष अरविंद गजभिये, डॉ. राजू पोद्दार, माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात निवडणूक लढविण्यात आल्या. भाजपने १२९ पैकी ७३ ग्रामपंचायतींवर आमचे वर्चस्व असल्याचा दावा केला आहे, तर ६५ ग्रामपंचायतींवर स्पष्ट बहुमत आमच्याकडे असल्याचा दावा भाजप ग्रामीणचे अध्यक्ष अरविंद गजभिये यांनी केला आहे. 

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया जिल्ह्यात भाजपने आपणच प्रथम क्रमांकावर असल्याचा दावा केला असून महाविकास आघाडीला  पिछाडीवर टाकले आहे. गोंदियामधील एका मतदार संघात माजी मंत्री राजकुमार बडोले यांना झटका बसला आहे. तर  विधानसभेचे अध्यक्ष  नाना पटोले  यांनी महाविकास आघाडीचे उमेदवार मोठ्या प्रमाणात निवडून आल्याचा दावा केला आहे.  चंद्रपूरमध्ये पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी ७५ टक्के जागा महाविकास आघाडीला मिळाल्याचा दावा केला आहे.  वर्धेतही महाविकास आघाडी आणि भाजपमध्ये काट्याची लढत झाली.