कृषी कायद्यावर तोडगा निघाला नाही तर संसदेला घेराव - राकेश टिकैत

February 25,2021

नवी दिल्ली : २५ फेब्रुवारी - वादग्रस्त कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी दिल्लीच्या वेशींवर सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला तीन महिने झाले असून नवी ऊर्जा भरण्याचे प्रयत्न शेतकरी नेत्यांकडून केले जात आहेत. केंद्राने तोडगा काढला नाही तर, संसदेला घेराव घालण्याचा इशारा भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी दिला आहे. तर, या आंदोलनाची व्याप्ती देशभर वाढवताना प्रामुख्याने किमान आधारभूत मूल्याच्या मुद्दय़ावर संयुक्त किसान मोर्चाकडून भर दिला जाईल.

शेतकरी आंदोलनाचे केंद्र बनलेल्या गाझीपूर सीमेवर ठाण मांडून बसलेले शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी, आता ४० हजार ट्रॅक्टरवरून लालकिल्लय़ावर नव्हे, ४० लाख ट्रॅक्टरांसह संसदेला घेराव घातला जाईल, अशी आक्रमक भूमिका राजस्थानमध्ये सीकर येथील महापंचायतीमधील मंगळवारी झालेल्या भाषणात घेतली. केंद्र सरकारने शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर ‘इंडिया गेट’च्या हिरवळीवर शेती करू, असेही टिकैत म्हणाले. संसदेच्या घेरावाची तारीख संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांशी चर्चा केल्यानंतर निश्चित केली जाईल, असे टिकैत यांनी सांगितले.

टिकैत यांच्या इशाऱ्यावर टिप्पणी करताना केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र तोमर यांनी, शेतकऱ्यांनी नवा प्रस्ताव दिला तर चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार असल्याचा पुनरुच्चार केला. तीन नव्या कायद्यांच्या अंमलबजावणीला दीड वर्षांसाठी स्थगिती देण्याचा प्रस्ताव केंद्राने शेतकरी नेत्यांना दिला होता. मात्र, तो ११ व्या बैठकीत फेटाळून लावल्यानंतर शेतकरी संघटना व केंद्र सरकार यांच्यातील चर्चेत खंड पडला आहे.

केंद्र सरकारला फक्त निवडणुकीची भाषा समजते. त्यामुळे विधानसभेची निवडणूक होत असलेल्या पश्चिम बंगाल, आसाम, तमिळनाडू आदी राज्यांमध्ये हमीभावाचा मुद्दा मांडला जाणार असून रब्बीचे पीक कृषिबाजारांमध्ये येणार असल्यानेही हा मुद्दा शेतकरी व जनसामान्यांपर्यंत पोहोचवणे महत्त्वाचे असल्याचे ‘स्वराज इंडिया’चे नेते योगेंद्र यादव यांनी स्पष्ट केले आहे. पंजाब-हरियाणामध्ये झालेले आंदोलन, दिल्लीच्या सीमांवरील ठिय्या आंदोलन आणि त्यानंतर २६ जानेवारी रोजी आंदोलनाचे हिंसक वळण असे तीन टप्पे झाले असून आता आंदोलन देशाच्या कानाकोपऱ्यात नेले जाईल, हा शेतकरी आंदोलनाचा चौथा व निर्णायक टप्पा असेल, असे यादव यांनी पत्रकारांना सांगितले.