म्हणून सरदार पटेलांचे नाव मिटवले गेले - हार्दिक पटेल यांची टीका

February 25,2021

अहमदाबाद : २५ फेब्रुवारी - अहमदाबाद येथील ‘सरदार पटेल स्टेडियम’चं नाव बदलून ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ असे केल्याने राजकारण तापायला सुरूवात झाली आहे. सरदार पटेलांचं नाव हटवल्यावरुन गुजरातमधील काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांनी भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर कडाडून टीका केली आहे.

सरदार पटेलांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निर्बंध घातले होते, म्हणून आरएसएसचे चेले त्यांचं नाव हटवण्याचा सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत, अशा शब्दात हार्दिक पटेल यांनी टिकास्त्र सोडलंय. सरदार पटेलांचा अपमान भारत सहन करणार नाही असा इशाराही हार्दिक पटेल यांनी दिला. “भारतरत्न, लोहपुरुष सरदार पटेल यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर निर्बंध घातले होते, म्हणून आरएसएसचे चेले त्यांचं नाव हटवण्याचा सर्वोतपरी प्रयत्न करत आहेत. मनातून द्वेष करायचा आणि तोंडावर मैत्री दाखवायची असंच वर्तन भाजपाचं सरदार पटेलांसोबत राहिलंय…पण एक गोष्ट लक्षात ठेवा, सरदार पटेलांचा अपमान हिंदूस्थान सहन करणार नाही”, अशा आशयाचं ट्विट हार्दिक यांनी केलं आहे. अजून एका ट्विटमध्ये “सरदार पटेल यांच्या नावे असलेल्या स्टेडियमचं नाव बदलून ‘नरेंद्र मोदी स्टेडियम’ करण्यात आलं. हा सरदार पटेलांचा अपमान नाही का? सरदार पटेल यांच्या नावानं मतं मागणारी भाजप आता पटेल यांचा अपमान करत आहे. गुजराजची जनता सरदार पटेल यांचा अपमान सहन करणार नाही”, असंही हार्दिक पटेल म्हणालेत.