मोबाईलच्या स्फोटात आई आणि दोन मुलांचा मृत्यू

August 11,2020

चेन्नई : ११ ऑगस्ट -  तामिळनाडूमध्ये मोबाईलचा स्फोट झाल्यामुळे आई आणि दोन लहान मुलांचा मृत्यू झाला आहे. ही घटना तामिळनाडूच्या करुरमध्ये घडली. या धक्कादायक घटनेमुळे तामिळनाडूमध्ये एकच खळबळ उडाली आहे. मुथूलक्ष्मी (29) असं मृत महिलेचे नाव आहे.

मुथूलक्ष्मी यांनी मोबाईल चार्जिंगला लावला होता आणि यावेळी त्या मोबाईलवरही बोलत होत्या. थोड्यावेळाने मोबाईल ठेवल्यानंतर अचानक त्यांच्या मोबाईलचा स्फोट झाला. हा स्फोट एवढा मोठा होता की, यामध्ये मुथूलक्ष्मी यांच्यासह त्यांच्या दोन मुलांचा मृत्यू झाला.

स्फोट झाला तेव्हा त्यांच्या घरात मुथूलक्ष्मी यांच्यासह तीन वर्षीय रणजीत आणि दोन वर्षाचा दक्षितही होता. स्फोटामध्ये हे तिघेही गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर या तिघांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषीत केले.

मुथूलक्ष्मीचे सहा वर्षांपूर्वी बाळकृष्णसोबत लग्न झाले होते. दोघे गेले काही वर्ष करुरमध्ये राहत होते. हे दोघेही जेवणाचे स्टॉल चालवतात. पण कर्ज वाढल्याने बाळकृष्ण याने कुटुंबाला सोडले होते. त्यानंतर मुथूलक्ष्मी एकटीच आपल्या कुटुंबाला सांभाळत होती. लॉकडाऊनमुळे तिच्या कमाईत घट झाली होती आणि कुटुंब आर्थिक संकटात सापडले होते.

दरम्यान, या घटनेमुळे करुर गावात सर्वत्र शोकाकूल वातावरण आहे. तसेच या घटनेचा अधिक तपास करुर पोलीस करत आहेत.