हिम्मत असेल तर चिनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राईक करून दाखवा - ओवैसींनी दिले भाजपला आव्हान

November 25,2020

हैद्राबाद : २५ नोव्हेंबर - हैदराबाद महापालिका निवडवणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा व ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहाद-उल-मुस्लिमीन (एआयएमआयएम)चे अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवेसी यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. भाजपाचे तेलंगणाचे प्रदेशाध्यक्ष खासदार बंडी संजय कुमार यांनी केलेल्या विधानावर पलटवार केला आहे. ”हिंमत असेल तर चिनी सैन्यावर सर्जिकल स्ट्राइक करून दाखवा. भाजपा लडाखमध्ये असे धाडस का दाखवत नाही, जिथं चीनने भारतीय जमीन ताब्यात घेतलेली आहे.” असं ओवेसींनी म्हटलं आहे.

ओवेसींनी या संदर्भात केलेल्या ट्विटसोबत एका सभेतील त्यांच्या भाषणाचा व्हिडिओ देखील शेअर केला आहे. ज्यामध्ये ते म्हणतात, ”भाजपावाल्यानो जर सर्जिकल स्ट्राइक कुठं करायची आहे, तर असदुद्दीन ओवेसी ज्याला तुम्ही प्रक्षोभक भाषण करणारा म्हणतात मी तुम्हाल पुन्हा एकदा सांगतो की, जर तुमच्यात हिंमत असेल तर मागील काही महिन्यांपासून लडाखमध्ये जिथं चिनी सैन्याने भारतीय जमीन ताब्यात घेतली आहे, नरेंद्र मोदी सर्जिकल स्ट्राइक करा चीनवर तुम्ही गप्प का बसला आहात? तुम्ही या देशाचे पंतप्राधान आहात व चीनचं नाव घेण्यासही घाबरत आहात. तुम्ही सर्जिकल स्ट्राइक करा , आम्ही तुमची प्रशंसा करू. सर्जिकल स्ट्राइककरून चिनी सैन्याला पळवून लावा. आपल्या लष्काराचे जवान जिथं शहीद झाले होते, तिथं तुम्ही धाडस दाखवणार नाही. भारतीय जमीन ताब्यात घेणार नाहीत. मात्र त्यांचा एक नेता म्हणतो की आम्ही जुन्या शहरावर सर्जिकल स्ट्राइक करू. तुम्ही काय सर्जिकल स्ट्राइक करणार? तुम्ही शहरासाठी काय केले आहे?”

“पालिका निवडणुकीत महापौरपद मिळवल्यानंतर आमचा पक्ष रोहिंग्या मुस्लीम आणि पाकिस्तानींना बाहेर काढण्यासाठी जुन्या हैदराबाद शहरावर सर्जिकल स्ट्राइक करेल” असे विधान बंडी संजय कुमार यांनी निवडणूक प्रचारसभेमध्ये केले होते. आता त्यावरुन वाद निर्माण झाल्याचे दिसत आहे .

 “हैदराबादमध्ये रोहिंग्या मुस्लीम असतील, तर अमित शाह काय करत आहेत?” असा सवाल एआयएमआयएमचे अध्यक्ष आणि खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केलेला आहे.