मोदींना आव्हान देणाऱ्या लष्करी जवानांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली

November 25,2020

नवी दिल्ली : २५ नोव्हेंबर - २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत वाराणसी मतदारसंघात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात निवडणूक लढणारे समाजवादी पक्षाचे उमेदवार तथा सीमा सुरक्षा दलाचे निलंबित जवान तेज बहादूर यांचा अर्ज फेटाळण्यात आला होता या निर्णयास आव्हान देणारी त्यांची याचिका सर्वोच्च न्यायालयाने धुडकावून लावली आहे. 

सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. ए. एस. बोपण्णा व न्या. व्ही. रामासतरुमानियां यांच्या खंडपीठाने समाजवादी पक्षाचे उमेदवार तेज बहादूर सिंह यांची याचिका धुडकावून लावली आहे. प्रस्तुत प्रकरणी गेल्या १८ नोव्हेंबर रोजी सुनावणी झाली होती. त्यानंतर खंडपीठाने अंतिम फैसला सुनावलं आहे.  

२०१९ सालच्या निवडणुकीत उत्तरप्रदेशातील वाराणसी मतदारसंघातून तेज बहादूर सर्वप्रथम अपक्ष रूपाने उमेदवारी अर्ज भरला होता. त्यानंतर सप-बसपच्या महाआघाडीने त्यांना पाठिंबा देत त्यांनाच संयुक्त उमेदवार घोषित केले होते. निवडणूक अधिकाऱ्यांनी  १ मे २०१९ रोजी त्यांचा दुसऱ्यांदा भरलेला अर्ज फेटाळला. त्यानंतर त्यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात  धाव घेतली परंतु तेथेही त्यांना न्याय मिळाला नाही. अखेर तेज बहादूर यांनी सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला  असता त्यांची याचिका धुडकावून लावण्यात आली आहे.