ममता बॅनर्जी इस्लामिक दहशतवादी - उत्तर प्रदेशच्या मंत्र्यांचा आरोप

January 19,2021

लखनऊ : १९ जानेवारी - पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी हिंदूविरोधी असल्याचा त्या इस्लामीक दहशतवादी असल्याचे उत्तर प्रदेश सरकारमधील संसदीय कार्यमंत्री आनंद स्वरुप शुक्ला यांनी म्हटल्याने एक नवीन वाद निर्माण झाला आहे. ममता बॅनर्जी या देशासाठी सर्वात मोठा धोका असल्याची टीकाही शुक्ला यांनी केली आहे. इतकेच नाही तर पश्चिम बंगालच्या निवडणुकांनंतर ममता बॅनर्जी यांना बांगलादेशमध्ये आश्रय  घ्यावा लागेल असेही  शुक्ला म्हणाले.

बलिया येथे पत्रकारांशी संवाद साधताना शुक्ला म्हणाले, ममता बॅनर्जींना भारतीयतेवर विश्वास नाहीय. त्या इस्लामिक दहशतवादी आहेत. त्यांनी पश्चिम बंगालमध्ये हिंदू देवी-देवतांना अपमानित करण्याचे आणि मंदिरे तोडण्याचे काम केले आहे. त्या बंगलादेशच्या इशार्यावर काम करतात, असे धक्कादायक आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहे. रोहिंग्या मुस्लिमांना नागरिकत्व देणे, हिंदूंना त्यांचे सण साजरे करु न देणे यासारख्या गोष्टी ममता बॅनर्जी पश्चिम बंगालमध्ये करत असल्याचा आरोपही शुक्ला यांनी केला. पश्चिम बंगालमध्ये होणार्या विधानसभा निवडणुकांमध्ये ममता बॅनर्जी यांचा दारुण पराभव होईल असे ते म्हणाले. 

शुक्ला म्हणाले भारत माता की जय आणि वंदे मातरम बोलणार्या मुस्लिमांचाच भारतात सन्मान केला जाईल. बंगलादेशमध्ये भाजपासोबत येथील बहुसंख्य जनता असल्याचा दावा शुक्ला यांनी केला. ममता या केवळ मुस्लिमांच्या नेत्या आहेत. त्या हिंदूंवर अत्याचार करत आहेत. पश्चिम बंगालमधील जनतेने निवडणुकीमध्ये ममतांना सत्तेमधून खाली खेण्याचा निश्चय केला, असेही त्यांनी म्हटले आहे. मागील दहा वर्षांपासून राज्यामध्ये ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसची सत्ता आहे. मात्र यंदाच्या निवडणुकीमध्ये तृणमूल काँग्रेसला भाजपाकडून जोरदार आव्हान मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. भाजपाने या निवडणुकीसाठी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर भाजपाने वरिष्ठ तसेच वेगवेगळ्या राज्यांमधील नेते आपल्या भाषणांमध्ये आणि छोट्या-मोठ्या कार्यक्रमांमधून ममता बॅनर्जींवर निशाणा साधताना दिसत आहेत. एप्रिल महिन्यामध्ये पश्चिम बंगालमधील एकूण २९४ जागांवर विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत.