चीनने पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसखोरी केली

January 19,2021

नवी दिल्ली : १९ जानेवारी - गलवान खोऱ्यातील तीव्र लष्करी संघर्षानंतर दोन्ही देशात लष्करी व राजनैतिक स्तरावर चर्चा सुरू असतानाच चीननं पुन्हा एकदा भारतीय हद्दीत घुसखोरी केली आहे. चिंतेची बाब म्हणजे यावेळी चीननं अरूणाचल प्रदेशात गावच वसवलं आहे. समोर आलेल्या सॅटेलाईट फोटोतून ही बाब स्पष्ट झाली आहे. चीननं तब्बल १०१ घरं बांधली असून, भारतीय सीमेपासून साडेचार किमी आतमध्ये येऊन चीननं हे बांधकाम केल्याचं वृत्तात म्हटलं आहे.

सॅटेलाईट फोटोतून दिसून आलेल्या दृश्यात चीननं अरुणाचलमध्ये हे गाव वसवलं असून, एनडीटीव्हीनं या छायाचित्रांची तज्ज्ञांकडून पडताळणी केल्यानंतर वृत्त दिलं आहे. हे फोटो १ नोव्हेंबर २०२० रोजी आहेत. चीननं ओलांडून ४.५ किमी भारतीय हद्दीत घुसखोरी करून हे गाव वसवलं असून, या गावात १०१ घरं बांधले असल्याचं वृत्तात म्हटलं आहे. सरकारी नकाशानुसार हा भाग भारतीय हद्दीत येतो, मात्र, १९५९ पासून त्यावर चीननं कब्जा मिळवलेला आहे. पूर्वी इथे फक्त चिनी सैन्याची चौकी होती. मात्र, नव्या छायाचित्रात इथे गाव वसवण्यात आल्याचं दिसत आहे.

अरुणाचल प्रदेशात असलेल्या अप्पर सुबनशिरी जिल्ह्याच्या हद्दीत हा भूभाग येतो. त्सारी चू नदीच्या काठावर चीननं हे गाव वसवलं असून, या भूप्रदेशावरून दोन्ही देशांमध्ये दीर्घकाळापासून वाद सुरू आहे. त्यामुळे दोन्ही देशांकडून या भागाला सशस्त्र लढाईची जागा म्हणून अधोरेखित करण्यात आलेलं आहे. पूर्व लडाखमध्ये गेल्या मे महिन्यापासून भारत आणि चीनचे सैन्य एकमेकांसमोर उभे ठाकले आहे, हा तिढा सोडविण्यासाठी दोन्ही देशांमध्ये लष्करी आणि राजनैतिक स्तरावर चर्चेच्या अनेक फेऱ्या आतापर्यंत झाल्या आहेत. मात्र, चीनकडून सीमेवरील कुरापती सुरूच आहेत. चीननं गाव वसवल्यानं भारताच्या चिंतेत भर पडली आहे.