लग्नाच्या वऱ्हाडाला बसने दिली धडक एका वऱ्हांड्याचा मृत्यू तर चौघांची प्रकृती चिंताजनक

February 23,2021

भंडारा : २३ फेब्रुवारी -  लग्न आटोपून वऱ्हाड परत जात असताना पिंपळगाव येथे रस्त्यावरील हनुमान मंदिराला ट्रॅव्हल्स ने धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका वऱ्हाड्याचा मृत्यू झाला. तर 34 जण जखमी झाले असून यापैकी चार जणांची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. गंभीर जखमींवर भंडारा व नागपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 

प्राप्त माहितीनुसार, रविवारी सायंकाळी गोंदिया जिल्ह्यातील किरणापूर गावात झालेल्या विवाह सोहळ्यात नागपूर येथील वऱ्हाड खासगी ट्रॅव्हल्समधून पोहोचले होते. समारंभ आटोपल्यानंतर रात्री उशिरा एमएच ४०/बीजी ४०९३ क्रमांकाची ट्रॅव्हल्सने लोक नागपुरला परत निघाले. यावेळी साकोलीच्या पुढे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 6 वर पिपळगावजवळ बसचालकाचे नियंत्रण सुटले आणि बस रस्त्यालगत असलेल्या हनुमान मंदिराला धडकली. या अपघातात प्रशांत गायकवाड ( 60) यांचा जागीच मृत्यू झाला. 

तर बसमध्ये 34 महिला, मुले आणि वृद्ध लोक जखमी झाले. सुरेश गायकवाड , अरुण मेंडे, राजन लांजेवार, प्रवीण गायकवाड (45), अजय जीवणे (43), वंशिका निकोसे (१) हे गंभीर जखमी आहेत. पिपळगाव येथील पोलिस पाटील सुरेश सोविंदा मते यांनी लाखनी पोलिसांना घटनेची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी बस चालक विलास दौलत डोंगरे (39) रा. नागपूर विरूद्ध गुन्हा दाखल केला आहे. प्रकरणाचा तपास पोलिस उपनिरीक्षक करीत आहेत.