रेमेडिसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या टोळीचा नागपूर पोलिसांनी केला पर्दाफाश

April 16,2021

नागपूर : १६ एप्रिल - राज्यात कोरोना  बाधितांची संख्या वाढत असतानाच रेमडेसिवीर इंजेक्शचा तुटवडा जाणवत आहे. अशा या संकट काळात काही जण ज्यादा दराने रेमडेसिवीरची विक्री करत असल्याच्या घटना समोर येत आहेत. अशाच प्रकारे रेमडेसिवीर वाढीव दराने विक्री करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश नागपूर पोलिसांनी  केला आहे. धक्कादायक म्हणजे अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका डॉक्टरचा  समावेश आहे.
नागपुरात दिवसेंदिवस वाढत असलेली कोरोना रुग्णांची संख्या आणि त्यातही मोठ्या प्रमाणात वाढत असलेले गंभीर रुग्ण चिंतेची बाब ठरत आहे. त्यातच गंभीर रुग्णांच्या उपचारासाठी वापरण्यात येणाऱ्या रेमडेसिवीरचा मोठ्या प्रमाणात होत असलेला वापर लक्षात घेता नागपुरातील काही डॉक्टरांनी आता याचा काळा बाजार करायला सुरुवात केली आहे. नागपूर पोलिसांनी रेमडेसिवीरचा काळाबाजार करणाऱ्या रॅकेटचा गुरुवारी रात्री पर्दाफाश केला आहे. यात एक डॉक्टर आणि तीन वॉर्ड बॉयला अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 15 रेमडेसिवीर इंजेक्शन जप्त करण्यात आले आहे.
पोलिसांनी कामठी येथील आशा हॉस्पिटलचे डॉक्टर लोकेश शाहू यांच्याकडे 16 हजार रुपयांत एक रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध असल्याची माहिती मिळाली होती. नागपूर परिमंडळ पाचचे पोलीस उपायुक्त निलोत्पल आणि त्यांच्या टीमने त्या ठिकाणी छापा घालून आशा हॉस्पिटल येथील डॉक्टरसह अन्य दुसऱ्या हॉस्पिटलमधून तीन वॉर्ड बॉयला अटक केली आहे. पोलिसांना या रॅकेटमध्ये आणखी काही लोक सामील असल्याची माहिती मिळाली असून पुढील चौकशी सुरू असल्याचेही पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी सांगितले.
एक व्यक्ती रेमडेसिवीर इंजेक्शन ब्लॅकमध्ये 10,000 रुपयांना विक्री करत असल्याची माहिती पुण्यातील गुन्हे शाखेच्या पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर पुणे पोलीस आणि एफडीएच्या अधिकाऱ्यांनी मिळून संयुक्तपणे कारवाईसाठी सापळा रचला. एक डमी ग्राहक वाघोली परिसरात पाठवला आणि आरोपीला दोन रेमडेसिवीर इंजेक्शनसह ताब्यात घेतले.
अशाच प्रकारे डिमेलो पेट्रोलपंज नगर रोड जवळ एक व्यक्ती 18,000 रुपयांत रेमडेसिवीर इंजेक्शन विक्री करत असल्याची माहिती पोलसाांना मिळाली होती. या ठिकाणी पुण्यातील गुन्हे शाखा युनिट 4 ने डमी ग्राहक पाठवून मोहम्मद मेहबुब पठाण आणि त्याच्या तीन साथीदारांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलिसांनी रेमडेसिवीर इंजेक्शनच्या दोन बॉटल्स जप्त केल्या आहेत.