कोविड रुग्णालयांना मिळणार सुरळीत ऑक्सिजन पुरवठा - रवींद्र ठाकरे

April 16,2021

नागपूर : १६ एप्रिल - नागपूर   जिल्ह्यातील सर्व डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल व खासगी रुग्णालयांना ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व अविरत मिळण्यासाठी ऑक्सिजन पुरवठयाचे जिल्हा प्रशासनातर्फे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार जिल्ह्यातील शासकीय व खासगी डेडिकेटेड ११ कोविड हॉस्पीटल यांना ६१.५ मेट्रीक टन लिक्विड ऑक्सिजन तर खासगी १७० रुग्णालयांना सुमारे ८ हजार ६२२ जेम्बो सिलेंडर उपलब्ध होणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी आज दिली.
कोविड रुग्णांना ऑक्सिजन अभावी उपचारामध्ये बाधा निर्माण होणार नाही यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ऑक्सिजन निर्माते, वितरक, शासकीय व खासगी कोविड हॉस्पीटलचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक घेवून यापुढे सर्व डेडिकेटेड कोविड हॉस्पीटलमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा निश्चित केला असून त्यानुसार वितरणाचे धोरण जाहीर केले आहे.
जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित करण्यात आली होती. याबैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी योगेश कुंभेजकर, अन्न व औषध प्रशासन विभागाचे सहायक आयुक्त पी. एम. बल्लाळ, सतीश चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी अविनाश कातडे आदी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
जिल्ह्यात तसेच शहरात कोविड-19 ने संक्रमित रुग्णांवर उपचार करण्यासाठी डेडिकेटेड कोविड हॉस्पीटल, कोविड हेल्थ सेंटर तसेच खासगी रुग्णालयांना मान्यता देण्यात आली आहे. या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत व अविरत असणे अत्यंत गरजेचे आहे. कोविड हॉस्पीटलमध्ये अपुरे ऑक्सिजनमुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर मात करण्यासाठी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी ऑक्सिजन वितरणाचे धोरण निश्चित केले आहे. त्यानुसार कोविड रुग्णांवर उपचार करणाऱ्या सर्व शासकीय व खासगी रुग्णालयांसाठी ऑक्सिजन साठा, सिलेंडरचे वितरण रिफल, डिस्टीबुटर यांच्यामार्फत पुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होईल.