वधूने चक्क सूट आणि पँट परिधान करून केले लग्न

November 29,2020

नवी दिल्ली : २९ नोव्हेंबर - लग्न म्हटले की विशेषत: वधूची जोरदार तयारी सुरू होत असते. भरजरी शालू किंवा लेहंगा परिधान करून वधू आपल्या जीवनातील या खास दिवसाला संस्मरणीय बनवत असतात. मात्र, अमेरिकेत भारतीय वंशाच्या एका वधूने चक्क सूट आणि पँट परिधान करून लग्न केले. या पोशाखावर तिने भारतीय वधूप्रमाणे डोक्यावरून ओढणीही घेतली होती हे विशेष! 

२९ वर्षांची इंटरप्रेन्योर संजना ऋषी हिने दिल्लीचा उद्योजक ध्रुव महाजन याच्याशी लग्न केले. हे दोघे अमेरिकेत एक वर्षापासून एकत्र राहत होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर दोघांनी थाटामाटात लग्न करण्याचे टाळले. लग्नात संजनाने लहेंगा किंवा साडी परिधान करण्याऐवजी पावडर ब्लू कलरचा पँट सूट परिधान केला होता. डोक्यावर ओढणी आणि भांगेत बिंदी होती! संजनाचा हा अनोखा वेडिंग ड्रेस सोशल मीडियात चर्चेचा विषय बनला. अनेक फॅशन डिझायनर्स आणि बॉलीवूड सेलिब्रिटींनी तिचे कौतुक केले. तिने हा पँट सूट इटलीतील एका बुटिकमधून खरेदी केला होता. तो एका इटालियन डिझायनरने १९९0 मध्ये बनवला होता. या पोशाखामुळे मला मी पॉवरफुल असल्याची जाणीव होते, असे तिने म्हटले आहे. या दोघांच्या लग्नात केवळ अकराजण सहभागी झाले होते.