वाशिममध्ये आदिवासी निवासी शाळेत २२९ विद्यार्थी कोरोनाबाधित

February 24,2021

वाशिम : २४ फेब्रुवारी - राज्यातील कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाशिम जिल्ह्यातील एका आदिवासी निवासी शाळेमधील 229 विद्यार्थ्यांनी कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. काल लातूरमधील एका शाळेत तब्बल 45 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 

वाशिम जिल्ह्यातील देगाव परिसरात एक आदिवासी निवासी शाळा आहे. या शाळेतील 327 पैकी एकूण 229 विद्यार्थ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. विद्यार्थ्यांसह चार कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. कोरोना झालेले बहुतांश विद्यार्थ्यांचे वय हे 13 ते 15 इतके आहे. तसेच बहुतांश विद्यार्थी हे अमरावती जिल्ह्यातील धारणी,अचलपूर आणि मेळघाट पट्टयातील भागातील आहेत.

हे सर्व विद्यार्थी 14 फेब्रुवारीला शाळेत दाखल होते. या सर्व विद्यार्थ्यांची RTPCR चाचणी करण्यात आली होती. या चाचणीनंतर कोरोना संसर्ग झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान निवासी शाळेमुळे मोठ्या प्रमाणात संसर्ग पसरला आहे. कोरोनाबाधित आढळलेल्या विद्यार्थ्यांपैकी काही विद्यार्थ्यांना थोडीशी सर्दी होती. उर्वरित विद्यार्थ्यांना कोणतेही लक्षणे अथवा त्रास जाणवत नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच या सर्व विद्यार्थ्यांच्या आरोग्य तपासणीसाठी 24 तास आरोग्य पथके तैनात करण्यात आली होती.